मुंबई : देश-विदेशातील गुंतवणूकदारांसाठी पोषक वातावरण तयार करुन गुंतवणूक वाढीवर भर देण्यासाठी राज्य शासनामार्फत नवनवीन योजना राबविण्यात येतात, यामुळे गुंतवणूकदाराना प्रोत्साहन मिळून गुंतवणूक वाढण्यास मदत होते असे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले. इंडिया बिझनेस ग्रुपच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी इंडिया बिझनेस ग्रुपचे अध्यक्ष विकास मित्तरसेन यांच्यासह इंडिया बिझनेस ग्रुपचे 50 सदस्य उपस्थित होते.
श्री. देसाई म्हणाले, महाराष्ट्र शासनाने नवीन औद्योगिक धोरण जाहीर केले आहे. त्याचा उद्योगांना चांगला फायदा होत आहे. मैत्री पोर्टलद्वारे एका छताखाली सर्व परवाने देण्याची सुविधा सुरु केली आहे. इंटिग्रेटेड इंडस्ट्रियल एरिया (आयआयए) योजनेद्वारे उद्योग उभारण्यासाठी चालना दिली जात आहे. महाराष्ट्र प्रमोशन काऊन्सिलची स्थापना करण्यात आलेली आहे. याद्वारे उद्योजक आपल्या संकल्पना, योजनांची देवाणघेवाण करू शकतात. यासोबत महाराष्ट्र ग्लोबल फोरम स्थापन करण्याचा शासनाचा विचार असल्याचे यावेळी श्री, देसाई यांनी सांगितले.
निर्यातदारांना मदत मिळावी, यासाठी विदेशात सक्षम अधिकारी नेमण्याचा विचार केला जाईल, असेही श्री. देसाई यांनी स्पष्ट केले. इंडिया बिझनेस ग्रुप समूहाने यात पुढाकार घ्यावा यासाठी शासन स्तरावर या समूहाला सर्व सहकार्य करण्याची ग्वाही श्री. देसाई यांनी यावेळी दिली.