मुंबई : सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 12 ज्येष्ठ मान्यवर व्यक्तींना राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदाच्या राज्य सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी मुंबई येथे केली. श्री. तावडे यांच्या अध्यक्षतेखाली गठित समितीने खालील मान्यवरांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे.
नाटक विभागासाठी सतीश पुळेकर, कंठ संगीतासाठी कमल भोंडे, उपशास्त्रीय संगीतासाठी मंगलाताई जोशी, मराठी चित्रपटासाठी मनोहर आचरेकर,कीर्तनासाठी तारा राजाराम देशपांडे, शाहिरीसाठी शाहीर अंबादास तावरे,नृत्यासाठी रत्नम जनार्धनम्, आदिवासी गिरीजनसाठी नीलकंठ शिवराम उईके,वाद्यसंगीतासाठी अप्पा वढावकर, तमाशासाठी हसन शहाबुद्दीन शेख,लोककलेसाठी लताबाई सुरवसे आणि कलादानसाठी सदाशिव देवराम कांबळे यांना हा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. १ लाख रुपये, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
नाटक, कंठसंगीत, उपशास्त्रीय संगीत, चित्रपट (मराठी), कीर्तन, शाहिरी,नृत्य,आदिवासी गिरीजन, कलादान, वाद्यसंगीत, तमाशा लोककला या बारा क्षेत्रात विशेष कामगिरी केलेल्या ज्येष्ठ कलाकाराला सन १९७६ पासून राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित दिमाखदार सोहळ्यात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. पुरस्कार घोषित झालेल्या सर्व मान्यवरांचे सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. तावडे यांनी अभिनंदन केले आहे.