पुणे : पूरामुळे कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील जनतेचे अपरिमित नुकसान झाले आहे. संपत्तीच्या नुकसानीबरोबरच लोकांची मनेही खचली आहेत. पूरग्रस्तांच्या मदतीला जावून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ‘एनएसएस’चे विद्यार्थी समाज उभारणीचे काम करत असल्याचे गौरोद्गार विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी काढले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळाचे पाचशे विद्यार्थ्यांचे पथक पूरग्रस्त कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मदत व पुनर्वसनाच्या कामाला पाठविण्यात आले. या पथकाच्या गाड्यांना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला. या वेळी डॉ. म्हैसेकर बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, प्रसुनजीत फडणवीस, प्राचार्य संजय चाकणे, प्राचार्य सुधाकर जाधवर, बागेश्री मंठाळकर, विद्यार्थी विकास मंडळाचे सदस्य डॉ. सदानंद भोसले उपस्थित होते.

डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, नैसर्गिक आपत्तीची दाहकता मोठी आहे. या पूरामुळे अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. शेतीचे, संपत्तीचे, जनावरांसह जीवित हानीही झाली आहे. या स्थितीत त्या ठिकाणच्या लोकांना मदत करण्याचे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. या कामाच्या निमित्ताने त्या भागात जाणाऱ्या एनएसएसच्या विद्यार्थ्यांचे आणि तेथील स्थानिकांचे आयुष्यभराचे ऋणानुबंध जुळणार आहेत. या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या सामाजिक भान निर्माण होईल.

कुलगुरू डॉ. नितीन करमळकर म्हणाले, नैसर्गिक आपत्तीमुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. शासनाच्या आणि स्वयंसेवी संस्थासह इतरांकडून पैसे आणि वस्तूरुपाने मदतीचा ओघ बाधित क्षेत्राकडे आहे. मात्र त्यांना हाताच्या रुपाने मदतीची आवश्यकता आहे. ती गरज एनएसएसचे विद्यार्थी भागवतील, त्या ठिकाणी स्वच्छतेसह इतर कामे विद्यार्थी करणार आहेत. ही प्रक्रीया पुढच्या सहा महिने चालणार असून विद्यार्थ्यांची विविध पथके मदतीसाठी त्या ठिकाणी जाणार आहेत. या निमित्ताने बाधित क्षेत्रातील लोकांच्या मनाला उभारणी मिळणार असून त्यांना आपत्ती व्यवस्थापनेचे धडे ही मिळतील.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य संजय चाकणे यांनी केले. सूत्रसंचालन स्वामीराज भिसे यांनी केले. तर आभार डॉ. सदानंद भोसले यांनी मानले.