मुंबई (वृत्तसंस्था) : विदर्भात कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसागणीक वाढ होतांना दिसत आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून वाशीम जिल्ह्यात काल मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष षण्मुगराजन एस. यांनी जारी केले आहेत.
पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र यायला मनाई आहे. सर्व शाळा, महाविद्यालयं, कोचिंग क्लासेस बंद राहतील, लग्न समारंभासाठी ५० व्यक्तींनाच परवानगी असेल, सुरक्षित अंतर आणि मास्कचा वापर बंधनकारक आहे अकोल्यामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.
गडचिरोली जिल्हयातही १ मार्चपर्यंत जमाव बंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे. बुलढाणा जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शहरी आणि ग्रामीण भागात संचारबंदीचा आदेश जारी केला आहे. इयत्ता ५ वी ते ९ वी पर्यंतच्या सर्व शाळा, सर्व महाविद्यालय, अन्य खाजगी शैक्षणिक प्रशिक्षण केन्द्र, खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस येत्या २८ फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.
धार्मिक कार्यक्रम यात्रा, सभा, बैठका यासाठी केवळ ५०व्यक्तिंनाच परवानगी असेल. मिरवणूक रॅली काढण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे. लग्नसमारंभासाठी केवळ ५० व्यक्तींनाच उपस्थिंत राहता येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण बंधनकारक असणार आहे. जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार दुपारी ४ नंतर बंद ठेवले जातील असे निर्देश जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी दिले आहेत. वर्धा जिल्हयातील शहरी तसेच ग्रामीण भागाकरीता जमावबंदीचे आदेश देण्यात आले असुन औषधाची दुकान सोडून इतर दुकान आणि बाजारपेठा सायंकाळी ७ पर्यंतच सुरू ठेवण्यात येणार आहेत.
हिंगोलीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे संचारबंदीबाबतचा बनावट आदेश समजमाध्यमांवर प्रसारित झाला आहे. हा आदेश बनावट असून जिल्ह्यात १४४ कलम लागू नाही अशा आशयाचा नवा आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी काढला आहे. नागरिकांनी ही बाब लक्षात घ्यावी, आणि अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.