मुंबई (वृत्तसंस्था) : अमरावती, यवतमाळ, अकोला या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. या जिल्ह्यांमधे ज्या भागात रुग्णसंख्या जास्त आढळून येत आहे तिथं कंटेनमेंट झोन जाहीर करुन तातडीनं प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्य सचिव संजय कुमार यांनी या तिन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
अमरावती जिल्ह्यात अचलपुर तालुका आणि अमरावती महापालिका क्षेत्र, यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ, पुसद आणि पांढरकवढा नगरपरिषद क्षेत्र, तर अकोला जिल्ह्यात अकोट आणि मुर्तीजापूर तालुका, तसंच अकोला महापालिका क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक आढळून येत आहेत. या भागातला संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हे निर्देश दिले आहेत.