पुणे (वृत्तसंस्था) : राज्यात गेल्या २० दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे; या पार्श्वभूमीवर उद्या रविवारी पुण्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत निर्णय घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे संपर्क मंत्री अजित पवार यांनी काल सांगितले.

मात्र या काळात नागरिकांनी देखील मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग, गर्दी टाळणे अशाप्रकारे स्वयंशिस्त पाळणे अत्यंत आवश्यक आहे, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

अजित पवार यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयातील रिक्रिएशन सभागृहात पोलीस पाल्यांना अनुकंपा तत्वावर भरतीसाठीचे प्रातिनिधिक स्वरुपातील नियुक्तीपत्र देण्यात आले. अनुकंपा तत्वावर भरती नियुक्ती पत्र मिळालेले आकाश पांडुरंग घुले यांनी नियुक्तीपत्र मिळालेल्या सर्वांच्या वतीने मनोगत व्यक्त केले.

कोरोना काळात कर्तव्य बजावताना त्यांचे वडील पांडुरंग घुलेंना कोरोनाची लागण झाली. त्यांनी २६ दिवस कोरोनाशी झुंज दिल्यानंतर त्यांचा कोरोनाने मृत्यू झाला.

वडिलांच्या मृत्युनंतर राज्य शासनाने आमच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत उपलब्ध करुन दिली; पोलीस विभागात भरती होणारे आम्ही सर्वजण राज्य शासनाचे आणि पोलीस विभागाचे मनापासून आभारी आहोत, असे आकाश घुले यावेळी बोलताना म्हणाले.