मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गाच्या वाढत्या तीव्रतेमुळे प्रशासन सावध झालं असून, नागरिकांनी काळजी घ्यावी आणि कोविडसंदर्भातल्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं, असं प्रशासनानं म्हटलं आहे. मराठवाड्यातही अतिशय वेगानं वाढणाऱ्या कोरोना संसर्गाच्या रुग्णांच्या संख्येमुळे प्रशासन सतर्क झालं असून, ही वाढ रोखण्यासाठी विविध उपाय योजना केल्या जात आहेत.
औरंगाबाद शहरात गेल्या चार दिवसांपासून दररोज शंभरच्या वर रुग्ण येत असल्यामुळे महापालिकेनं किलेअर्क आणि एमजीएम क्रीडासंकुलातली कोविड केंद्रं पुन्हा सुरू केली आहेत. पैठण तालुका प्रशासनानं तालुक्यातल्या सगळ्या आठवडी बाजारांवर बंदी घातली असून, लग्न समारंभ, अंत्यसंस्कार, कोचिंग क्लास आणि हॉटेल्ससाठी कठोर नियम लागू केले आहेत.
जालना जिल्ह्यात मंगल कार्यालयं आणि कोचिंग क्लासेसची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातल्या तीर्थक्षेत्र जयदेववाडी इथं सत्तावीस रुग्ण आढळल्यानं प्रशासन आणि गावकऱ्यांनी गाव बंद ठेवत यात्राही रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहेत. त्यामुळे गरज नसेल तर घराबाहेर पडूच नका, असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. उद्यापासून चाचण्यांची संख्या आणखी वाढवली जाणार आहे. जिल्हा परिषदेत काल झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी याबाबत निर्देश दिले. सुपर स्प्रेडर, अर्थात अनेकांच्या संपर्कात येणारे भाजीवाले, दुधवाले, सलून, घरकाम करणाऱ्या महिलांच्या चाचण्यांना गती देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
कोरोना संसर्ग कमी करायचा असेल तर सगळ्यांना स्वयंशिस्त बाळगावी लागेल, असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना केलं आहे. तूर्त लॉकडाऊन लावणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. लॉकडाऊनमुळे आर्थिक फटका बसू शकतो. त्यामुळे या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला सकारात्मकरीत्या प्रतिसाद द्यावा, असंही त्यांनी म्हटलंय.
दरम्यान वाशिम जिल्ह्यात कालपासून रात्री ८ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. त्यानुसार रुग्णवाहिका, औषधांची दुकानं, ठोक भाजीपाला विक्री, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री, ऑटोरिक्षा, महामार्गावरचे पेट्रोलपंप आणि ढाबे, एमआयडीसी क्षेत्रातले उद्योग हे वगळता सर्व आस्थापना सकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंतच चालू ठेवता येतील. आठवडी बाजार, गुरांचे बाजार बंद राहतील. तर, लग्न समारंभासाठी पूर्वपरवानगी आवश्यक आहे.
माघी एकादशीनिमित्त पंढरपुरात गर्दी होऊ नये, यासाठी पंढरपूर शहर आणि परिसरातल्या दहा गावांमध्ये २३ फेब्रुवारीपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी यासंदर्भातला आदेश जारी केला. यंदा कोविड प्रादुर्भावामुळे दिंड्या, पालख्या यांना बंदी घालण्यात आली आहे. भाविकांनी एकादशीला पंढरपूरला येऊ नये असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे.
तसेच उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्यानं होत असलेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातल्या आठ तालुक्यांच्या ठिकाणी ९६० क्षमतेची डेडिकेटेड कोविंड केअर सेंटर सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहेत. तर तुळजापूरचे तहसीलदार सौदागर तांदळे यांनी तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी विना मास्क भाविकांना प्रवेश बंदी केली आहे. उस्मानाबादमधल्या मध्यवर्ती शिवजयंती सार्वजनिक महोत्सव समितीनं आयोजित केलेले सांस्कृतिक कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्विभूमीवर रद्द केले आहेत.
हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून दररोज रुग्णसंख्या वाढत चालली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी आता जिल्ह्यात धरणं आंदोलन आणि सभांवर बंदी घातली आहे. बंदी मोडणाऱ्यावर कारवाई करण्याचा इशाराही आदेशाद्वारे दिला आहे.
नांदेड जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात असून नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर तसंच सुरक्षित अंतर राखून सहकार्य करावं, म्हणजे प्रशासनाला कठोर निर्णय घेण्याची गरज पडणार नाही, आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांनी केलं आहे. सध्या नांदेड जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू केला आहे. जिल्ह्यात लॉकडाऊन लावला असल्याच्या बातम्या चुकीच्या आहेत. तसा संदेश समाज माध्यमाद्वारे प्रसृत करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.
परभणी जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वोभूमीवर लागू केलेल्या निर्बंधांचं उल्लंघन केल्याबद्दल एका मंगल कार्यालयाला ५० हजार रुपयांचा दंड प्रशासनानं ठोठावला आहे. धार रस्त्यावर गोल्डन फंक्शन हॉलमध्ये पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या निमित्तानं हजारों लोक जमा झाल्याबद्दल ही कारवाई केल्याची माहिती तहसीलदार डॉ. संजय बिरादार यांनी काल दिली. दुसऱ्यांदा असा प्रकार घडला तर मंगल कार्यालय विशिष्ट कालावधीसाठी सील केले जाईल, असा इशारा प्रशासनानं दिला आहे.