नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुलांचं प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच व्हायला हवं असं उपराष्ट्रपती एम. व्यंकैय्या नायडू यांनी म्हटलं आहे. ते आज आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाच्या निमित्ताने बहुभाषिकतेविषयी आयोजित वेबिनारला संबोधित करत होते. आजच्या काळात मुलांचं शिक्षण, घरात बोलल्या जात नसलेल्या भाषांमधे होत आहे, आणि ही दुर्दैवी गोष्ट आहे असं ते म्हणाले.
भारतातली भाषिक विविधता हा देशाच्या प्राचीन संस्कृतीचा मूलाधार आहे, मातृभाषेत ज्ञानाचं भंडार असतं, त्यामुळेच आपण आपल्या भूतकाळाला वर्तमानाशी जोडून घेऊ शकतो असं ते म्हणाले. आपली सामाजिक-संस्कृतिक अस्मिता टिकवून ठेवण्यासाठी मातृभाषांचं संरक्षण आणि प्रसार करायला हवा असं त्यांनी सांगितलं. देशभरातल्या प्रशासनात मातृभाषेचा वापर करायची गरजही नायडू यांनी अधोरेखित केली.