मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना काळात आरोग्य कर्मचारी आणि सामान्य नागरिकांसोबतच सरकारच्या विविध विभागांनी उल्लेखनीय काम केलं, अशा शब्दात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे. ठाणे जिल्ह्यातल्या मुंब्रा आणि कौसा या भागातल्या ४० कोरोना योद्ध्यांचा काल कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन इथं झालेल्या एका कार्यक्रमात सत्कार झालात, त्यावेळी ते बोलत होते.
या काळात लोकांची सेवा करणाऱ्या नागरिकांनी भगवान गौतम बुद्ध तसंच महात्मा गांधीं यांनी मांडलेला करुणा भाव जागवला असं राज्यपाल म्हणाले. लोकांमधला सेवा, समर्पण आणि करुणाभाव टिकून राहिला तर करोनासारख्या इतर संकाटांचाही पराभव करता येईल असं ते म्हणाले. महाराष्ट्र आणि केरळमधे दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करत खबरदारी घेतली नाही, तर कोरोनाचा पुन्हा उद्रेक होऊ शकतो असा इशाराही राज्यपालांनी यावेळी दिला.