नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात व्यवसाय करणाऱ्या सर्व समाज माध्यमांना भारतीय कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करावे लागेल, असे केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केले आहे.
ओव्हर द टॉप अर्थात ओटीटी, ऑनलाईन स्ट्रिमिंग आणि समाजमाध्यमे या डिजिटल मंचांसाठी केंद्र सरकारने काल नीतीमूल्यविषयक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना अमित शहा म्हणाले की, या नियमांमुळे समाज माध्यमांचा वापर करणाऱ्यांना अधिक अधिकार मिळाले असून त्यांच्या तक्रारींची दखल घेतली जाण्याची ग्वाही दिली गेली आहे.
काल जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार समाज माध्यम मंचांना तक्रारींची दखल घेण्यासाठी प्रमुख अनुपालन अधिकाऱ्याची तसेच नोडल संपर्क कर्मचारी आणि निवासी तक्रार निवारण अधिकाऱ्याची नेमणूक करणे बंधनकारक असेल.
यापुढे समाज माध्यमांना खोडसाळ आशय प्रसारित करण्यास सुरुवात करणाऱ्या व्यक्तीचे नाव उघड करावे लागेल, असे दूरसंवाद आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना या मार्गदर्शक सूचनांची माहिती देताना सांगितले.