पुणे : कोरोना प्रतिबंधक  उपाययोजनांत यापूर्वी पुणे जिल्ह्यात देण्यात आलेले आदेश 14 मार्चपर्यंत कायम ठेवण्यात आले आहेत.

कोवीड-१९ विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने शाळा, महाविदयालये, सर्व खाजगी क्लासेस व इतर शाळा दि.01 मार्च 2021 ते दि. 14 मार्च 2021 पर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिली.  साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढील काही काळ निर्बंध आवश्यक असल्याने  हा निर्णय घेण्यात आला आहे. वैद्यकीय सेवा, जीवनावश्यक सेवा यांना या निर्णयातून यापूर्वी दिलेली सवलत कायम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पुणे जिल्हयात कोवीड- 19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या  अनुषंगाने दि. 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत पुणे जिल्हयातील सर्व शासकीय व खाजगी शाळा, महाविद्यालये, सर्व खाजगी क्लासेस बंद ठेवण्यात आले आहेत. परंतु, पुणे जिल्हयात कोवीड-19 विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कोवीड 19 बाधीत रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. पुणे जिल्हयातील सर्व शासकीय व खाजगी शाळा, महाविदयालये, सर्व खाजगी क्लासेस व इतर शाळा दि.14 मार्च 2021 पर्यंत बंद ठेवण्याचा आदेश देण्यात येत आहेत, मात्र ऑनलाईन पध्दतीने शाळा, महाविदयालये, सर्व खाजगी क्लासेस व इतर शाळा सुरु राहतील तसेच पुणे जिल्हयात 10 वी व  12 वीच्या विदयार्थ्यांचे नुकसान होणार नाही यासाठी संबंधित शिक्षणाधिकारी, गट शिक्षण अधिकारी यांनी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. नियोजित परिक्षा आवश्यक असल्यास कोरोना 19 विषाणुच्या उपाययोजनांचे पालन करुन घेण्यात याव्यात. शक्यतो ऑनलाईन पध्दतीने परिक्षा घेण्यात याव्यात, असेही आदेशात म्हटले आहे.

सदर आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था आणि संघटना यांनी उल्लंघन केल्यास त्यांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि साथरोग कायदा, 1897 आणि या संदर्भातील शासनाचे इतर अधिनियम व कायद्यातील इतर नियमान्वये योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, तसेच

सदर आदेशाची अंमलबजावणी दिनांक 28 फेब्रुवारी 2021 पासून तात्काळ लागू करण्यात येत असल्याचेही आदेशात म्हटले आहे.