मुंबई (वृत्तसंस्था) : कौटुंबिक जबाबदारी, शेती- व्यवसाय सांभाळून मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीमध्ये सर्वाधिक योगदान असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काल केले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा २६ वा दीक्षान्त समारंभ कुलपती भगत सिंह कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत काल झाला.
त्यावेळी ते बोलत होते. या दीक्षान्त समारंभात नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना आभासी पद्धतीने पदवी प्रदान करण्यात आली. कोरोना काळात टाळेबंदीमुळे घरूनच शिक्षण घेणे आवश्यक झाले. अशा वेळी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची तंत्रज्ञानावर आधारित दूरस्थ शिक्षण पद्धती सर्व विद्यापीठांसाठी मार्गदर्शक ठरली, असे कोश्यारी म्हणाले.
पदवी मिळाल्यावर स्नातकांनी आपले शिक्षण न थांबवता निरंतर सुरू ठेवून चांगल्या समाजाच्या निर्मितीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.