मुंबई : कोरोनाचा प्रकोप अद्याप संपलेला नाही. परंतु आपले काम थांबवून चालणार नाही. त्यामुळे निर्भीडपणे परंतु बेफिकीरीने न वागता सर्वांना आपापले कार्य करावे लागेल असे सांगून इतःपर कोरोनाबाबत जागरुकता कायमच ठेवावी लागेल असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून गोरक्षक सेवा ट्रस्ट या संस्थेच्या ६ व्या वर्धापन दिनानिमित्त काल (दि. 8) राज्यपालांच्या हस्ते नारी शक्ती सन्मान, राष्ट्रीय सेवा सन्मान व कोरोना योद्धा सन्मान प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
राज्यपालांच्या हस्ते अभिनेत्री आयेशा जुल्का, रोशनी सिंह, चांद सुलताना यांचेसह विविध क्षेत्रातील 11 महिलांना उल्लेखनीय कार्याबद्दल नारी शक्ती सन्मान देण्यात आले. खासदार राहुल शेवाळे यांना यावेळी राष्ट्रीय प्रतिभा सन्मान देण्यात आला. ऱ्होएन फार्माचे व्यवस्थापकीय संचालक स्वामी सुर्या सतिश तसेच गऊ भारत ट्रस्टचे अध्यक्ष संजय शर्मा यावेळी उपस्थित होते.
कोरोनाचे गंभीर संकट सर्व देशांपुढे उभे ठाकले असताना भारताने वसुधैव कुटुम्बकम् या शिकवणीला अनुसरून विविध देशांना लस उपलब्ध करून दिली. देशातील जनसामान्य लोकांनीदेखील या काळात आपापसातील मतभेद दूर सारून परोपकाराचे कार्य केले, असे सांगून ज्या दिवशी समाजातून दातृत्व भाव संपेल त्या दिवशी समाज लयाला जाईल असे राज्यपालांनी सांगितले.
चंद्रकांत शहासने, सर्पमित्र वनिता व्होराडे, सुनीता राजेश मेहता, हेमंतकुमार तान्तिया, हरीश भागद्रिगे, राम कुमार पाल, अॅड प्रितेश विश्वनाथ, अखिलेश पांडे, राकेश जैन, डॉ. अमूल्य साहू, डॉ. खालिद शेख, मॉरिस नोरोन्हा, अजय सहाय, मेहमूद अली, डॉ. हशिम अली सय्यद, बागप्पा बागोडी, डॉ. विजय गुप्ता, विकास कुमार विश्वकर्मा, भारत अमीन, राहूल शेवाले यांना राज्यपालांनी राष्ट्रीय प्रतिभा सन्मानाने सन्मानित केले.
यावेळी राज्यपालांनी जयश्री भार्गव, अनुराधा शिंदे, सिद्धि मित्तल, डॉ. स्नेहलता दुधाळ, डॉ. वर्तिका त्रिपाठी, डॉ. हेमलता त्रिपाठी, रेखा त्रिपाठी, अॅड रुबीना रिझवी यांना नारी शक्ती सन्मान देऊन गौरविले. संजय कुमार, गणेश पाचारणे, प्रदीप जैन, पवन कुमार पाठक, विनित फालक यांचा कोरोना वॉरियर्स म्हणून सत्कार केला.