नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत बांगलादेश दरम्यान फेणी नदीवर उभारण्यात आलेल्या मैत्री पुलामुळे ईशान्य भारत आणि बांगलादेशमधील दळणवळणाला गती मिळणार असून, दोन्ही देशातील संबंध आणखी दृढ होण्यास मदत होणार आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

भारत आणि बांगलादेशमधील दळणवळण अधिक सुकर व्हावं यासाठी त्रिपुरा ते बांगलादेश दरम्यान उभारण्यात आलेल्या मैत्री सेतूचं उद्घाटन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालं; त्यावेळी ते बोलत होते.

बांगलादेशच्या प्रधानमंत्री शेख हसीना या ही या कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाल्या होत्या. यावेळी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजनही करण्यात आलं. भारतातील सबरूम आणि बांगलादेशमधील रामगढ दरम्यान हा सेतू उभारण्यात आला आहे. यामुळे त्रिपुरा हे भारताचं ईशान्येकडील प्रवेशद्वार म्हणून भरभराटीस येईल. राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळानं133 कोटी रुपये खर्चून हा सुमारे 2 किलोमीटर लांबीचा सेतू उभारला आहे.