नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात घेण्यात आलेल्या जे ई ई मुख्य परिक्षेचे निकाल काल जाहीर करण्यात आले असून राष्ट्रीय चाचणी यंत्रणेनं दिलेल्या माहितीनुसार, सहा उमेदवारांना शंभर पर्सेंटाईल मिळाले आहेत.

या विद्यार्थ्यांमध्ये दिल्लीचे प्रवर कटारिया आणि रंजीम प्रबल दास, गुजरातचा अनंत कृष्णा किदाम्बी, महाराष्ट्रातील सिद्धार्थ मुखर्जी, चंडीगढचा गुरुमित सिंग आणि राजस्थानचा साकेत झा यांचा समावेश आहे.

गेल्या महिन्यात राष्ट्रीय चाचणी यंत्रणेनं परदेशातील ९ केंद्रांसह देशातील ३३१ शहरांमध्ये आणि आठशेहून जास्त केंद्रांवर ही परीक्षा आयोजित केली होती. त्यासाठी साडेसहा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली होती.

यंदा प्रथमच विविध १३ भाषांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली. विद्यार्थ्यांना परीक्षा देणं सुकर व्हावं आणि आपले गुण सुधारण्याची संधी मिळावी, म्हणून या वर्षीपासून ही परीक्षा वर्षातून चार वेळा घेण्यात येणार आहे.