पिंपरी : शुक्रवारी मध्यरात्री विठ्ठलवाडी, आकुर्डी येथे रुपेश काळभोर हे आपली चारचाकी वाहन पार्क करत होते. त्यावेळी त्यांची तोंड ओळख असलेला आरोपी आमन पुजारी आणि त्याच्यासोबत आठ ते दहा जण हातामध्ये कोयते, लाकडी दांडके घेऊन तिथे आले. या टोळक्याने रुपेश यांना लाकडी दांडक्याच्या धाक दाखवून त्यांच्या हातातील घड्याळ आणि पाकीट हिसकावून घेतले. तसेच त्यांच्या नवीन स्वीफ्ट कारची काच फोडली. त्याचबरोबर आजुबाजूच्या 15 ते 20 वाहनांच्या काचा फोडून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला.

निगडी पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. त्याच्यांकडे दाखल गुन्ह्याबाबत विचारणा केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चार लोखंडी कोयते, दगड, दांडकी, तीन दुचाकी असा दोन लाख 10 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक निकाळजे यांनी दिली, तसेच पुढील तपास निगडी पोलीस करत आहेत.