मुंबई : कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथे आलेला महापूर, राज्यातील दुष्काळी परिस्थिती तसेच यापुढे येणारे सणासुदीचे दिवस विचारात घेऊन राज्यातील जनतेची गैरसोय होऊ नये याकरिता दुकानदारांनी संपावर न जाण्याचे आवाहन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत रास्त भाव दुकानदारांनी आपल्या मागण्यांबाबतचा प्रस्तावित संप संघटनांच्या वतीने मागे घेतला असल्याचे मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी सांगितले.
श्री. पाटील-निलंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकीपर्स फेडरेशन, पुणे आणि अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ, पुणे या दोन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत आज मंत्रालयात बैठक घेण्यात आली. यावेळी अन्न, नागरी पुरवठा विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
श्री. पाटील- निलंगेकर म्हणाले, रास्त भाव दुकानदारांच्या मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने केंद्र शासनाच्या अधिकाऱ्यांसमवेत विविध मागण्यांबाबत चर्चा करण्यात येत आहे.