मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदेच्या 40 हजार प्राथमिक शाळांमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रम राबविण्यात येत असून त्याचा लाभ सुमारे 22 लाख विद्यार्थ्यांना मिळाला आहे.
विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनात घटनात्मक मूल्ये रुजावीत यासाठी राज्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांसाठी मूल्यवर्धन कार्यक्रम तयार करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांमधील रचनावादी दृष्टीकोन विकसित करण्यावर भर देण्यात येत असून यामध्ये पालक आणि शिक्षक यांचा अधिकाधिक समावेश होत आहे. शांतीलाल मुथ्था फाऊंडेशनने प्राथमिक शिक्षकांना मूल्यवर्धन कार्यक्रमाचे पूर्व प्रशिक्षण दिले आहे.
या कार्यक्रमाअंतर्गत गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना देत असताना विद्यार्थ्यांचा फक्त बुद्ध्यांक नाही तर भावनिक बुद्ध्यांक वाढविण्यावर भर देण्यात येत असून महाराष्ट्र विद्या प्राधिकरणामार्फत मूल्यवर्धन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. हा कार्यक्रम 36 जिल्ह्यांत 215 तालुक्यात 3,163 केंद्रातील 40 हजार 231 प्राथमिक शाळांमध्ये पोहोचला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत 1 लाख 15 हजार 126 शिक्षकांनी प्रशिक्षण घेतले आहे. तर 22 लाख 65 हजार 249 विद्यार्थ्यांनी शिक्षण मिळाले आहे. या शैक्षणिक वर्षात राज्यातील उर्वरित जिल्हा परिषद शाळांमध्ये हा उपक्रम राबविला जाणार आहे.
मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांचे ज्ञान, कौशल्य आणि आकलनक्षमता वाढविण्यास मदत होत आहे. शिक्षकांच्या मूल्यसंवर्धन आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तासंवर्धनावर विशेष भर देण्यात येत आहे. हा कार्यक्रम मराठीप्रमाणेच हिंदी, इंग्रजी, उर्दू भाषांमध्येही उपलब्ध आहे.
राज्य शासनाने 2015 मध्ये मूल्यवर्धन कार्यक्रमाचा सुधारित आराखडा तयार केला. तर हा आराखडा 2016 पासून 34 जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक केंद्र या कार्यक्रमासाठी निवडण्यात आले. 2017 मध्ये त्याची व्याप्ती 107 तालुक्यातील 20 हजार शाळांपर्यंत वाढविण्यात आली. यावर्षी सर्व जिल्हा परिषद शाळांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचवला जाणार आहे.