मुंबई (वृत्तसंस्था) : द्राक्ष, डाळिंब आणि भाजीपाल्यातली कीटकनाशकं, रासायनिक अंश तपासण्यासाठी सांगली जिल्ह्यात आधुनिक प्रयोगशाळा उभारली जाणार असल्याची माहिती कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी दिली आहे. ते काल सांगली इथं बातमीदारांशी बोलत होते. कीटकनाशकांच्या उर्वरित अंश नियंत्रणाचे विदेशातले निकष अत्यंत कडक असल्यामुळेच, निर्यात योग्य मालाची निवड करण्यासाठी स्थानिक प्रयोगशाळेची गरज असते. सध्या अशी प्रयोगशाळा पुण्यात असल्यानं शेतकऱ्यांवर खर्चाचा भार येतो. त्यावर पर्याय म्हणून सांगलीत प्रयोगशाळा उभारायचा निर्णय घेतल्याचं कदम यांनी सांगितलं. या प्रयोगशाळेमुळं दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन घ्यायला मदत होईल, असं कदम म्हणाले.