नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात वाढत असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून चर्चा केली. कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी त्वरित आणि ठोस उपाय योजना करण्याची गरज असल्याचे ते यावेळी म्हणाले. कोरोना संबंधी नियमांचे कठोर पालन करत असतानाच हलगर्जीपणा न होऊ देण्याचे आवाहन त्यांनी केले.

गेल्या आठवड्यात देशातील ७० जिल्ह्यांमध्ये कोरोना बाधितांच्या संख्येत दीडशे पट वाढ दिसून आल्याचे त्यांनी नमूद केले. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यातील वाढत्या रुग्णसंख्येबाबत त्यांनी विशेष चिंता व्यक्त केली.

गेले वर्षभर राबवलेली ‘चाचणी, शोध आणि उपचार’ ही त्रिसूत्री आतादेखील काटेकोरपणे राबवण्याचे आग्रही प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

प्रत्येक कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेल्याचा कमीत कमी वेळात शोध घेऊन त्यांची आर.टी.पी.सी.आर. चाचणी करावी असे मोदी म्हणाले. विशेषतः लहान शहरांमध्ये चाचण्या आणि रुग्णवाहिकांच्या उपलब्धतेवर विशेष लक्ष देण्यास त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.

आतापर्यंत देशभरातील एकंदर रुग्णसंख्येपैकी ९६ टक्के रुग्णांनी कोविड-१९ आजारावर मात केली असून, भारताचा मृत्यूदर जगात सर्वात कमी असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.

तसंच देशात वेगाने होत असलेल्या लसीकरणाची आणि एकाच दिवसात ३० लाख लसीकरणाचे लक्ष्य साध्य केल्याबद्दल सर्व यंत्रणेची त्यांनी प्रशंसा केली.