पुणे पश्चिम चक्राकार (रिंगरोड) महामार्गाबाबतचा आढावा
30 एप्रिलपर्यंत मोजणी पुर्ण करण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांचे निर्देश

पुणे : पुणे पश्चिम चक्राकार मार्ग (रिंगरोड) राज्य महामार्ग (विशेष क्रमांक 1) म्हणून राज्य शासनाकडून महामार्ग महाराष्ट्र अधीनियम 1955 अन्वये घोषित करण्यात आला असून राज्य महामार्गासाठी जमिनीच्या भूसंपादनाच्या अधिसूचनाही राज्य शासनाने निर्गमित केली आहे. पुणे पश्चिम चक्राकार (रिंगरोड)’च्या मोजणी व भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याच्या दृष्टीने आज रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार व जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आढावा घेतला. ‘पुणे पश्चिम चक्राकार (रिंगरोड)’च्या मोजणी प्रक्रियेला गती देण्यासोबतच 30 एप्रिलपर्यंत मोजणी प्रक्रिया पुर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात पुणे पश्चिम चक्राकार (रिंगरोड) महामार्गाबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी भूसंपादन उपजिल्हाधिकारी प्रविण साळुंखे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख राजेंद्र गोळे यांच्यासह उपविभागीय अधिकारी, उपअधिक्षक भूमी अभिलेख, सहायक संचालक, नगररचनाकार यांच्यासह सबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी प्रकल्पाची माहिती, प्रक्रियेत विविध विभागांची जबाबदारी व समन्वय, प्रकल्पाची भूसंपादन प्रक्रिया, संयुक्त मोजणी प्रक्रिया आदींसह प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती दिली.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, पुणे पश्चिम चक्राकार (रिंगरोड)’च्या मोजणी सुरू करण्यापुर्वी सदर गावातील नागरिकासोबत बैठक घेवून त्यांना प्रकल्पाची रुपरेषा सांगावी तसेच नागरिकांना असणा-या शंकाचे समाधान करावे, जेणेकरून भुसंपादन, मोजणी प्रक्रियेला गती मिळेल. मोजणी करतेवेळी संपादन होणा-या जागेचे मुल्यांकन करण्यासाठी मोजणीवेळी सबंधित विभागाच्या अधिकाऱ्याने उपस्थित रहावे तसेच मोजणी 30 एप्रिलपर्यंत पुर्ण करावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी दिले.