मुंबई : शेतकरी हिताच्या योजनांची माहिती, रोजचा बाजार भाव शेतकऱ्यांना सहज उपलब्ध व्हावा, यासाठी कृषी पणन मंडळाने मोबाईल ॲप विकसित केले आहे. या ॲपवर शेतकऱ्यांना बाजारविषयक अद्ययावत माहिती सहज उपलब्ध होत असल्याची माहिती पणनमंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिली.
श्री. शिंदे म्हणाले, सध्या अनेक व्यवहार मोबाईलवर करण्यात येतात. कोणतीही माहिती एका क्लिकवर उपलब्ध होऊ शकते. कृषी पणन मंडळाच्या माध्यमातून राबवित असलेले विविध प्रकल्प, योजना, उपक्रम, बाजारभाव, बाजार समित्यांची एकत्रित माहिती शेतकऱ्यांना सहजरित्या उपलब्ध व्हावी यासाठी मोबाईल ॲप विकसित करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील व इतर राज्यातील बाजार समित्यांमध्ये होणारी शेतमालाची रोजची आवक, बाजार भाव, शेतकरी उत्पादक कंपन्यांची माहिती, शेतकरी आठवडी बाजार, कृषी पणन मित्र मासिक, फलोत्पादन निर्यात प्रशिक्षण, सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था इ. बाबतची सर्व माहिती सुध्दा शेतकऱ्यांना या ॲपद्वारे उपलब्ध करून दिली जात आहे.
सर्व बाजार समित्यांना त्यांच्या आवारात आवक होणाऱ्या शेतमालाची दैनिक आवक व बाजारभाव याबाबतची माहिती या ॲपद्वारे भरता येते. त्यामुळे बाजार समित्यांमधील बाजारभावांची माहिती एकत्रितरीत्या उपलब्ध होते. शेतमालाची थेट विक्री अथवा खरेदी करण्यासाठी विक्रेता व त्याचा शेतमाल आणि खरेदीदार याबाबत माहिती प्रसिद्ध करण्याची सुविधा या ॲपद्वारे उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ॲप वापरणाऱ्यास कृषी पणन मंडळामार्फत सूचना देण्याची सुविधा या ॲपमध्ये उपलब्ध आहे.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे हे ॲप MSAMB या नावाने गुगल प्ले स्टोअरला मराठी व इंग्रजी या दोन भाषांमध्ये विनामूल्य उपलब्ध आहे, असेही श्री.शिंदे यांनी सांगितले.