मुंबई : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे नवीन लाभांची सुधारित आश्वासित प्रगती योजना खासगी शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांना लागू करण्याबाबत 31जुलै 2019 रोजी एका अभ्यासगटाची नियुक्ती करण्यात आली आहे.

खासगी शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनाही नवीन लाभांची सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळावा, अशी मागणी शालेय शिक्षण मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्याकडे करण्यात येत होती. शिक्षक संघटनांनी केलेल्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन, शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी लागू करण्याबाबत सुधारित तरतुदी करण्यात आल्याचा, शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाने निर्गमित केला आहे.

सदर अभ्यासगट आपला अहवाल व त्यावरील शिफारशी राज्य शासनास कळविणार असून दरम्यानच्या काळात याबाबत निर्णय अंतिम होईपर्यंत शिक्षकांना वरिष्ठ/निवड श्रेणी लागू करण्यासंदर्भातील कार्यपद्धती ठरविण्यात आली आहे.

23 ऑक्टोबर, 2017 पूर्वी वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणीकरिता असलेल्या निकषांप्रमाणे वरिष्ठ व निवड श्रेणीकरिता पात्र असणाऱ्या शिक्षकांची यादी संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांनी तातडीने जाहीर करणे आवश्यक असणार आहे. जे शिक्षक वरिष्ठ/निवड श्रेणीकरिता पात्र झाले आहेत, त्यांना याकरिता स्वतंत्र अथवा विशेष प्रशिक्षण पूर्ण करण्याची आवश्यकता असणार नाही. वरिष्ठ/निवड श्रेणी मंजूर करताना शिक्षकांचे मागील 2 वर्षाचे समाधानकारक गोपनीय अहवाल विचारात घेण्यात येणार आहेत.

सदर शासन निर्णय शासनाच्याwww.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.