नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात कालअखेर कोविड-१९ वरील लसीच्या ५ कोटी ९४ लाख मात्रा देण्यात आल्या आहेत. लसीकरण सुरु झाल्यापासून काल एकाहत्तारावा दिवस होता. काल रात्री ८ वाजेपर्यंत दिवसभरात १५ लाखहून अधिक लसीच्या मात्रा टोचण्यात आल्याचं आरोग्य मंत्रालयानं नवी दिल्ली इथं सांगितलं.  केवळ ७१ दिवसात ६ कोटी लसींची मात्रा देणारा भारत हा जगातील एक सर्वात गतिमान देश ठरला आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाला १६ जानेवारी रोजी सुरुवात झाली. तर आघाडीवरील कोरोना योद्ध्यांचं लसीकरण २ फेब्रुवारीपासून सुरु झालं. एक मार्चपासून ६० वर्षांहून अधिक आणि सह-व्याधी असलेल्या ४५ वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांना लस देण्यास सुरुवात करण्यात आली.

या टप्प्यातील केवळ २७ दिवसांमध्ये ६० वर्षांवरील २ कोटी ७३ लाख नागरिक आणि सह-व्याधी असलेले ४५ वर्षांवरील ६५ लाखांहून अधिक नागरिकांना कोविड-१९ वरील लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे.