नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : म्यानमारमधल्या लष्करी राजवटीनं इथल्या लोकशाहीवादी नेत्या आंग सान स्यु की यांच्यावर गोपनीयतेच्या कायद्याचा भंग केल्याचा आरोप ठेवला आहे. स्यु की, त्यांचे तीन सहकारी आणि त्यांचे आर्थिक सल्लागार यांच्यावर गेल्याच आठवड्यात हे आरोप ठेवण्यात आले होते, त्याबाबतची माहिती नुकतीच जाहीर करण्यात आली. गोपनीयतेच्या कायद्याचा भंग केल्याबद्दल १४ वर्षांची शिक्षा होऊ शकते. स्यु की यांच्यावर आधीही काही आरोप ठेवण्यात आले आहेत.
यामध्ये बेकायदा वॉकी टॉकी बाळगणे, कोरोना नियमांचा भंग करणे आणि लोकांमध्ये भीती निर्माण होईल अशी माहिती प्रसिध्द करणे, या आरोपांचा समावेश आहे. दरम्यान, लष्करी राजवटीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनात, सुरक्षा रक्षकांनी केलेल्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या ५३६ नागरिकांमध्ये ४३ बालकांचा समावेश असल्याचा दावा ‘सेव्ह द चिल्ड्रेन’ या सामाजिक संस्थेनं केला आहे.म्यानमारमध्ये लोकशाही मार्गानं निवडून आलेल्या सरकारच्या हातून लष्करानं सत्ता काढून घेतल्याच्या घटनेला काल दोन महिने पूर्ण झाले.