नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संपूर्ण देश कोविडशी लढत असताना महाराष्ट्र कुठंही मागे नव्हता आणि राहणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सांगितलं आहे. ते काल प्रधानमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतलेल्या, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत बोलत होते.

देशातल्या सर्व पक्षांच्या नेत्यांना मोदी यांनी संबोधित करून, या लढ्यात कुठलंही राजकारण आणू नये असं सांगावं, अशी आग्रही मागणी ठाकरे यांनी केली. राज्यातल्या कोरोना स्थितीबाबत, तसंच राज्य सरकारनं केलेल्या उपाययोजनांबाबत त्यांनी माहिती दिली. राज्यानं मोठ्या प्रमाणावर चाचण्या वाढवल्या असून आणखीही वाढवल्या जात आहेत असं त्यांनी सांगितलं.

प्राधान्यक्रम गटातल्या सुमारे १ कोटी ७७ लाख नागरिकांचं लसीकरण करण्याचं उद्दिष्ट आहे. त्यासाठी दर आठवड्यात ४० लाख लसींचा पुरवठा करावा. आता या घडीला राज्यांकडे खूप कमी साठा असून काही केंद्रं बंद पडली आहेत. १५ एप्रिलनंतर १७ लाख ४३ हजार डोसेस दिले जातील, असं केंद्र सरकारनं सांगितलं आहे, मात्र त्यामुळे लसीकरण मोहिमेत खंड पडेल. म्हणून आमच्या मागणीप्रमाणे एकदमच पूर्ण वितरण व्हावं, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी मोदी यांना केली.

हाफकिनला लस उत्पादन परवानगी लवकर मिळावी. त्यासाठी राज्य शासनानं प्रस्ताव पाठवला आहे. तो लवकर मान्य झाला तर तंत्रज्ञान हस्तांतर प्रक्रियेनं दरवर्षी २२ कोटी ८० लाख मात्रा तयार केल्या जातील आणि लसीकरण मोहिमेला वेग येईल, असंही त्यांनी सांगितलं. २५ वर्षांवरच्या सर्वाना लसीकरण गरजेचं आहे या मागणीचा पुनरुचारही त्यांनी केला. राज्याला ऑक्सिजनची खूप गरज असून त्याचा पुरवठा व्हावा.

आताची कोविड बाधित रुग्णांची संख्या पहाता एप्रिल अखेरपर्यत १ हजार ७०० ते २ हजार ५०० टन  इतक्या ऑक्सीजनची मागणी असेल. त्यामुळे पुरवठा सुरळित राहण्यासाठी महाराष्ट्राला लिक्विड मेडिकल ऑक्सीजनचा पुरवठा होणं अत्यंत निकडीचं आहे, असं त्यांनी सांगितलं.देशभरातल्या औषध उत्पादकांकडून रेमडीसीव्हीरचा पुरवठा व्हावा, या औषधाच्या किंमतीवर ड्रग कंट्रोलरचं नियंत्रण असावं, रेमडिसीवीरची निर्यात थांबवावी, जादा १२०० व्हेंटीलेटर्स द्यावेत, अशा मागण्याही त्यांनी केल्या.