मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत सध्या कोविड-१९ मुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता दक्षिण मुंबईतल्या जुमा मशिदीमधे चालू रमजान महिन्यात नमाजासाठी एकत्र जमण्याची परवानगी देता येणार नाही असं उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.
या मशिदीची क्षमता ७ हजार जणांना सामावून घेण्याची असून एका वेळी किमान ५० जणांना रमजानच्या नमाजासाठी एकत्र जमण्याची परवानगी सध्याच्या निर्बंधकाळात असावी अशी मागणी करणारी याचिका मशिदीच्या विश्वस्तमंडळानं दाखल केली होती.
त्यावर न्यायमूर्ती R D धानुका आणि न्यायमूर्ती V G बिश्त यांच्या खंडपीठाने सांगितलं की, सध्या कोविड महामारीमुळे परिस्थिती गंभीर असून नागरिकांनी आपापल्या धार्मिक प्रथांचं पालन घरातच करावं आणि सरकारला सहकार्य करावं. कायदा सुव्यवस्था आणि नागरिकांची सुरक्षा या बाबींना सर्वोच्च प्राधान्य असल्याचं सांगत काल न्यायालयाने याचिका निकाली काढली.