मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई आणि ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरुद्ध अकोल्यातल्या सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात काल रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. हे प्रकरण ठाणे पोलिसांकडे वर्ग केलं जाणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

ठाणे शहर पोलिस आयुक्तपदी असताना परमबीर सिंग यांनी हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार वरीष्ठ पोलीस निरीक्षक भिमराज घाडगे यांनी पोलिस महासंचालक तसंच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांकडे केली आहे.

त्याबरोबरच, परमबीर सिंग यांच्यासह २७ पोलिस अधिकाऱ्यांनी आपल्याला जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार घाडगे यांनी सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात दिली आहे. या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलिसांनी परमवीर सिंग यांच्यासह २७ पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध ॲट्रॉसिटीसह २२ कलमान्वये  गुन्हा दाखल केला आहे.

भीमराज घाडगे यांच्या तक्रारीवरून परमबीर सिंग यांच्याविरुद्ध आणखी काही गुन्हे दाखल होणार असून त्यामध्ये भ्रष्टाचारासह अन्य काही गंभीर प्रकरणांचा समावेश असल्याचं सूत्रांनी सांगितलं.