नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील वीजेची मागणी यावर्षी ऑगस्टपासून वाढत असल्याचं केंद्रीय वीज मंत्रालयानं म्हटलं आहे. यावर्षी ऑगस्टमध्ये १२४ बिलियन युनिट वीज वापरली गेली तर कोविड कालावधीच्या पूर्वी ऑगस्ट २०१९ मध्ये १०६ बिलियन युनिट म्हणजेच १८ ते २० टक्के अधिक वीज वापरली गेली. या महिन्याच्या चार तारखेला १ लाख ७४ हजार मेगावॅट वीजेची मागणी होती, गेल्या वर्षी याच दिवसाच्या तुलनेत ती १५ हजार मेगावॅटनं अधिक होती. वीजेच्या मागणीत वाढ होत आहे याचा अर्थ अर्थव्यवस्था वाढत असल्याचं चिन्ह आहे असं मंत्रालयानं म्हटलं आहे. तसंच सौभाग्य कार्यक्रमाखाली २८ दशलक्षहून अधिक घरांना वीज पुरवण्यात आल्यानंतर या घरांमध्ये वीजेवर चालणारी उपकरणं खरेदी करण्यात आली. ऑगस्ट महिन्यात कोळसा खाणी असलेल्या भागांमध्ये सतत पाऊस पडत असल्यामुळं खाणींमधून कमी पुरवठा झाला, वीज प्रकल्पांमधील कोळशाचा सरासरी साठा गेल्या रविवारी सुमारे चार दिवस पुरेल इतका आहे आणि मंत्रालयाची मध्यवर्ती व्यवस्थापन चमू हा पुरवठा सुधारण्यासाठी त्यावर सतत लक्ष ठेवून आहे.