मुंबई (वृत्तसंस्था) : देशात उच्च तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रातही महाराष्ट्र चांगलं काम करत आहे, याचा आपल्याला अभिमान आहे. राज्याचा विकास करताना सर्व क्षेत्रातील समतोल विकास महत्त्वाचा आहे, असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं. नवी दिल्लीस्थित अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्थेच्या ५० व्या वार्षिक अधिवेशनात ते काल बोलत होते. यावेळी विज्ञान तसंच उच्च तंत्रशिक्षण क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेल्या विविध मान्यवरांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर यांना यावर्षीच्या जीवनगौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं. हा पुरस्कार आयआयटी नवी दिल्लीचे अध्यक्ष प्रतापसिंह देसाई यांच्या हस्ते माशेलकर यांना त्यांच्या निवासस्थानी प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रातील उत्तम कामगिरीसाठी विविध शैक्षणिक संस्थांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.