नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वामित्व योजनेमुळे लोकांना बँकांकडून कर्ज घेणं सोपं जाणार आहे. असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. त्यांनी आज मध्य प्रदेशमधल्या प्रधानमंत्री स्वामित्व योजनेतल्या लाभार्थींसोबत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आज संवाद साधला. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते एक लाख ७१ हजार लाभार्थींना ई-मालमत्ता पत्र अर्थात ई-प्रॉपर्टी कार्डाचं वितरण करण्यात आलं. १९ जिल्ह्यामधल्या तीन हजार गावांतल्या लाभार्थ्यांना ही मालमत्ता पत्रं देण्यात आली. या आधी मालमत्तेचे कागदपत्र नसल्यामुळे लोकांना सावकारांनकडे भीक मागावी लागायची आता माझ्या गरिब भावा-बहिणीवर ही वेळ येणार नाही, असं प्रधानमंत्री म्हणाले. मालमत्तेचे कागदपत्र नसणं ही जागतिक समस्या आहे, त्यावर केंद्र सरकारनं उपाय शोधला आहे, असंही ते म्हणाले. यावेळी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे देखिल उपस्थित होते.