कामगार कल्याण मंडळाच्या केंद्रात लसीकरण केंद्र सुरु करा

पिंपरी : कोरोना कोविड -19 च्या जागतिक महामारीत अवघे जग संकटात सापडले आहे. भारतात रोज हजारो रुग्ण दगावत आहे. या महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी लसीकरण आणि विलगीकरण प्रभावी ठरत आहे. राज्यात पायाभूत सुविधांची आणि प्रशिक्षित मनुष्य बळाची कमतरता भासत आहे. यावर पर्याय म्हणून कामगार कल्याण मंडळाच्या राज्यातील विविध वास्तूंमध्ये कोविड केअर सेंटर आणि लसीकरण केंद्र उभारावीत अशी मागणी केंद्रिय कामगार कल्याण मंडळाच्या आणि महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळाच्या माजी सदस्या डॉ. भारती चव्हाण यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्राव्दारे केली आहे.

डॉ. भारती चव्हाण यांनी लिहीलेल्या पत्रात पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या अधिनियम कलम 3 नुसार कामगारांच्या कल्याणकारी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र कामगार कल्याण निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये कारखाने अधिनियम 1948 अंतर्गत येणारे सर्व कारखाने मोटार वाहतूक कामगार अधिनियम 1961 लागू होतो अशा ट्रव्हल्स एजन्सी किंवा ट्रान्सपोर्ट कंपनी, मुंबई दुकाने आणि आस्थापना अधिनियम 1948 च्या लागू होतो अशी सर्व दुकाने आस्थापना यांच्याकडून जमा होणा-या निधीतून उभारण्यात आलेल्या कामगार कल्याण मंडळाच्या बहुउपयोगी वास्तू राज्यभरात आहेत. कामगार कल्याण मंडळाचे मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अकोला असे एकूण सात विभाग आहेत.

या सात विभागात अठरा गट कार्यालये आणि एकूण 233 केंद्र आहेत. यामध्ये बहुउपयोगी हॉल, भव्य क्रिडांगणे, कार्यालये, ग्रंथालय आणि अनेक सभागृह आहेत. या वास्तूंमध्ये शासनाने शक्य असेल तेथे कोविड केअर सेंटर आणि लसीकरण केंद्रे सुरु करावीत. याचा उपयोग त्या – त्या भागातील कामगारांना आणि त्यांच्या कुटूंबियांना प्राधान्याने होईल. यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षित मनुष्यबळ खाजगी रुग्णालयांच्या सहकार्याने मिळवता येईल. वेळ प्रसंगी कामगार देखील स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन राष्ट्रीय कर्तव्य बजावतील. असेच पत्र कामगार मंत्री हसन मुश्रीफ, कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू आणि कामगार आयुक्त यांना देखील पाठविले आहे.