महाराष्ट्रात लसीकरणासाठी केरळ पॅटर्न राबवावा…..ॲड. वैशाली काळभोर
पिंपरी : कोरोना कोविड -19 चे लसीकरण आता राज्यात वेगाने सुरु आहे. वय वर्षे अठरा ते चव्वेचाळीस वयोगटातील नागरीकांना ‘कोविन’ (cowin.gov.in) या संगणक प्रणालीवर किंवा ‘सेतू’ (Setu) या ॲपवर आगाऊ नोंदणी करावी लागते. या दोन्हीही संगणक प्रणालीमध्ये अनेक त्रुटी आहेत. त्या दूर कराव्यात आणि ‘केरळ’ पॅटर्न प्रमाणे राज्यात लसीकरणाची मोहिम राबवावी अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा ॲड. वैशाली काळभोर यांनी केली आहे.
ॲड. वैशाली काळभोर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र पाठवून ही मागणी केली आहे.
या पत्रात ॲड. वैशाली काळभोर यांनी पुढे म्हटले आहे की, कोविन या संगणक प्रणालीमध्ये आणि सेतू या ॲपमध्ये अनेक त्रुटी आहेत. यामुळे नागरीकांना नाहक मनस्ताप होतो. तसेच लशीच्या हजारो मात्रा देखिल रोज वाया जात आहेत. 18 ते 44 वयोगटातील नागरीकांना ‘कोविन’ वर नोंदणी करताना पुढील दोन ते अडीच महिण्यांच्या तारखा दिसतात. त्या निवडल्यानंतर पीनकोडची निवड करावी लागते. यानंतर रुग्णालयाची निवड करावी लागते. नंतर दिनांक व वेळ निश्चित करता येते. जर यामध्ये पुण्यामधिल एखाद्या व्यक्तीने पिंपरी चिंचवड मधिल पीनकोड निवडून रुग्णालय निवडले तरी त्यांची नोंदणी होते. परंतू पुण्यातील व्यक्तीला दिलेल्या दिवशी नियोजित वेळेत लस केंद्रावर पोहचणे शक्य होतेच असे नाही, किंवा मधल्या काळात ती व्यक्ती समजा आजारी पडली तरी लस घेण्यासाठी येत नाही. अनेकांना लस केंद्र वेळेत सापडत नाही. एका लस केंद्रावर सरासरी रोज दोनशे लोकांना लस देण्यात येते. एका व्हायलमध्ये दहा लशीच्या मात्रा असतात. हि व्हायल फोडल्यानंतर त्याचे तापमान कायम ठेवण्यासाठी आईस पॅकचा वापर करावा लागतो. फोडलेली व्हायल चार तासात वापरावी लागते. परंतू दोनशे नोंदणीकृत व्यक्तींपैकी प्रत्येक केंद्रांवर रोज दोन ते नऊ व्यक्ती वेळेत येतच नाहीत. त्यामुळे फोडलेल्या व्हायल वाया जातात. एैनवेळी केंद्रातील कर्मचारी त्या लशीच्या मात्रा कोणाला देऊ शकत नाहीत. तसेच कोणाचेही नाव एैनवेळी संगणक प्रणालीत नोंदविता येत नाही. या त्रुटी दूर करुन वाया जाणा-या लशींच्या मात्रा उपयोगात आणाव्यात. त्याचप्रमाणे सेतू ॲपवर देखिल अनेक त्रुटी आहेत. यामध्ये नोंदणी करताना ओटीपी नंबर सेंड झाल्याचा मेसेज मोबाईलवर येतो. परंतू मोबाईलवर ओटीपी नंबर यायला कधी कधी एक तासाहून जास्त वेळ लागतो. आलेला ओटीपी नंबर अवघ्या तीन मिनीटांसाठी ग्राह्य असतो. त्यामुळे पुन्हा सर्व नोंदणीची प्रक्रिया करावी लागते. एवढे सगळे करुनही पुढील दोन ते तीन महिण्यांच्या सर्व तारखा, सर्व सेंटरवर ‘स्लॉट’ उपलब्ध नसल्याचा मेसेज येतो.
तसेच एैंशी वर्षांपेक्षा जास्त वयस्कर नागरीकांना फक्त रुग्णालयांतील केंद्रांवरच लस देण्यात येते. याबाबत देखिल नागरीकांमध्ये व या यंत्रणेमध्ये समन्वय नाही याबाबत जनजागृती करावी. तसेच या दोन्हीही लस नोंदणीच्या संगणक प्रणालीतील त्रुटी दूर कराव्यात आणि राज्यात ‘केरळ पॅटर्न’ प्रमाणे अंमलबजावणी करावी. त्यामुळे नागरीकांचा मनस्ताप कमी होईल आणि वाया जाणा-या लशींच्या मात्रा वाचतील. याबाबत आपण ताबडतोब संबंधित अधिका-यांना आदेश द्यावेत अशीही मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा ॲड. वैशाली काळभोर यांनी केली आहे.