मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड १९ महामारीच्या कारणाने राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या असून विद्यार्थ्यांच्या गुणांचं मूल्यमापन करण्यासाठी शिक्षण मंडळाने अद्याप काहीही सूत्र तयार केलेलं नाही. दहावीच्या परीक्षा रद्द करुन सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय मंडळाने घेतला.
मात्र ११वी प्रवेशप्रक्रीयेत या विद्यार्थ्यांना फटका बसू शकतो तसंच ICSE, CBSE आणि राज्य मंडळाची गुणांकन पद्धत वेगवेगळी आहे. त्यामुळे केंद्रसरकारने याप्रकरणी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांच्या हितासाठी समान धोरण तयार करावं अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली आहे.
त्या सुनावणीदरम्यान शिक्षण मंडळाने ही माहिती दिली. राज्य शिक्षण मंडळ, ICSE, CBSE आणि केंद्रसरकारने यावर जबाब दाखल करावा असा आदेश देऊन न्यायमूर्ती SJ काथावाला आणि न्यायमूर्ती SP तावडे यांच्या खंडपीठाने पुढची सुनावणी उद्या १९ मे रोजी ठेवली आहे.