मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या जिल्हा परिषदेतले ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी यांच्या कायम प्रवास भत्त्यात वाढ करुन तो पंधराशे रुपये करण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला.
आयुष मंत्रालयाअंतर्गत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडीसिनल प्लान्टस ही संस्था सिंधुदूर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील अडाळी इथं स्थापन करण्याच्या केंद्र शासनाच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे तसंच यासाठी ५० एकर जागा देण्याचा प्रस्तावही बैठकीत मंजूर करण्यात आला.
ठाणे महानगरपालिका हद्दीतील दिवा रेल्वे स्टेशन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. या ठिकाणी रेल्वे क्रॉसिंगवर पूल बांधणं आवश्यक असल्यामुळे सध्याच्या विकास योजनेमध्ये फेरबदल करण्याच्या प्रस्तावाला या बैकीत मान्यता देण्यात आली.
नवीन अविभाज्य शर्थींने दिलेल्या इनाम आणि महार वतन तसंच देवस्थान जमीन वगळून अन्य वतन जमिनी, ज्या भोगवटादार वर्ग-२ च्या आहेत, त्यांच्यावरील अकृषिक बांधकामं गुंठेवारी कायद्याअंतर्गत नियमित करण्यासाठी अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.