नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही हॉटेल्सच्या सहकार्यानं कोविड प्रतिबंधक लसीकरणाची पॅकेजेस देणारी खासगी रुग्णालयं राष्ट्रीय कोविड लसीकरण कार्यक्रमाच्या मार्गदर्शक सूचनांचं उल्लंघन करत असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं या अनुषंगानं सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य सचिवांना पत्र लिहून अशा प्रकारे राबविण्यात येत असलेल्या लसीकरण मोहिमांवर देखरेख ठेवण्यास आणि या संबंधी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचं योग्य प्रकारे पालन केलं जाईल, याची खबरदारी घेण्यास सांगितलं आहे.

सध्या देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार केवळ चार प्रकारच्या कोविड लसीकरण केंद्रांना परवानगी असल्याचं पत्रात नमूद केलं आहे. यामध्ये सरकारी आणि खासगी आरोग्य सेवा देणारी लसीकरण केंद्र, कामाच्या ठिकाणी तसंच वयोवृद्ध आणि दिव्यांग व्यक्तींच्या लसीकरणासाठी त्यांच्या घरांजवळ, गृहनिर्माण संस्था, पंचायत भवन किंवा तत्सम संस्थामार्फत चालवल्या जाणाऱ्या लसीकरण केंद्रांचा समावेश आहे.