पिंपरी : 1 जून 2021 पासून पिंपरी चिंचवड मधिल सर्व व्यापारी आस्थापना, दुकाने दिवसातून किमान सहा तास सुरु ठेवण्यास परवानगी द्यावी अशी मागणी पिंपरी मर्चंन्ट फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवाणी यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.

पिंपरी चिंचवड शहरात सध्या कोविड -19 चे रुग्ण रोज पाचशेपेक्षा कमी आढळत आहेत. दि. 30 मे पर्यंत पीसीएमसी रुग्णालयात कोविड -19 चे उपचार घेणा-या रुग्णांची संख्या 2546 आहे. तर मनपाची सर्व रुग्णालय आणि ‘ट्रिपल सी’ मध्ये अनेक बेड रिकामे आहेत. मृत्यूचे प्रमाण आणि सक्रिय रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे. हि आकडेवारी विचारात घेऊन पिंपरी चिंचवडचे आयुक्त राजेश पाटील यांनी स्वता:च्या अधिकारात दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी द्यावी. रोज सकाळी आठ ते दुपारी दोन असे दिवसातून किमान सहा तास दुकाने सुरु ठेवली, तरी व्यापा-यांना दिलासा मिळेल. मागील चार वर्षांपासून सर्वच व्यावसायिक तीव्र आर्थिक मंदिचा सामना करीत आहेत. यापुर्वी नोटाबंदी, जीएसटीमुळे सर्वच उद्योग व्यवसायांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. मार्च 2020 पासून आजपर्यंत बहुतांश दिवस लॉकडाऊनमुळे दुकाने बंद ठेवावी लागली. त्या कालावधीत व्यापा-यांना जीएसटी, बँकांचे व्याज, कामगारांचे पगार, दुकानाचे भाडे, वीजबील, मनपाचा मिळकत कर भरावा लागला आहे. मुलांची शाळेची फि भरावी लागली आहे. उत्पन्न बंद असताना सर्व खर्च मात्र सुरु आहेत. आता ‘ब्रेक द चेन 2’ टप्प्यात दुकाने उघडण्यास परवानगी मिळावी अन्यथा व्यापारी स्वता: होऊन दुकाने सुरु करतील. आता कोरोना नाही तर उपासमारीने मरण्याची वेळ कामगार व त्यांच्या कुटूंबियांवर आली आहे. मे महिण्यापर्यंत सर्वच व्यापा-यांनी आपल्या कामगारांना पुर्णता किंवा अंशता पगार दिला आहे.

‘ब्रेक द चेन 2’ मध्ये राज्य सरकारने अत्यावश्यक सेवेमध्ये पावसाळी वस्तू विक्रेते (रेनकोट, छत्री) यांचा समावेश केला आहे. चक्री वादळाच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व्यावसायिकांना लागणा-या कच्चा मालाच्या पुरवठादारांना दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी मिळणार आहे. त्याचप्रमाणे मोबाईल विक्रेत्यांचा देखिल आता अत्यावश्यक सेवेमध्ये समावेश करावा. ऑनलाईन शिक्षण, ऑनलाईन कंपन्यांचा बैठका, टेलिमेडीसिन, वर्क फ्रॉम होम यामुळे सर्वांनाच मोबाइलची आवश्यकता आहे. तसेच इतर छोटे मोठे उद्योजक व व्यापारी देखिल आर्थिक संकटात सापडले आहेत. औद्योगिक आस्थापनांना, उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांना परवानगी दिली आहे. परंतू त्यांना लागणा-या कच्चा मालाच्या पुरवठादारांना देखिल परवानगी मिळणे आवश्यक आहे. कंपन्यांमध्ये मशिनरींची दुरुस्ती करण्याची वेळ येते. त्या मशिनरींचे सुटे भाग विकणा-या व्यापा-यांना, हार्डवेअर, इलेक्ट्रिक वस्तू विक्रेते, कपडा व्यापारी यांनाही परवानगी मिळावी. व्यापा-यांना परवानगी दिल्यानंतर ते शासनाने सांगितलेल्या मार्गदर्शक सुचनांचे जसे की, मास्क वारणे, सामाजिक अंतर पाळणे, सॅनिटायझर वापरणे या सर्व नियमांचे सर्व व्यापारी पालन करतील. तरी आयुक्तांनी व्यापा-यांच्या या मागणीचा सहानुभूतीपुर्वक विचार करावा अशीही मागणी अशीही मागणी पिंपरी मर्चंन्ट फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवाणी यांनी केली आहे.