मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्राला गेल्या सव्वा वर्षांत कोरोनाच्या दोन लाटांसह चक्रीवादळांसारख्या नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागला, मात्र राज्यानं त्यावरही मात करीत विकासाला खीळ बसू दिली नाही असं प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ च्या चाचणीचा आज शुभारंभ कांदिवलीतील आकुर्ली स्थानकावरून करण्यात आला. या चाचणीला मुख्यमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर ते बोलत होते. मेट्रो २ अ दहीसर ते डी. एन. नगर मार्गावर आहे तर अंधेरी पूर्व ते दहीसर पूर्व मेट्रोमार्गाचं नाव मेट्रो ७ आहे. जानेवारी २०२२ पासून ही मेट्रो प्रवासी सेवेत रुजू होण्याची शक्यता आहे. यावेळी टर्मिनल १ आणि २ च्या पश्चिम द्रुतगती महामार्गावरच्या नियंत्रित प्रवेश भुयारी, उन्नत प्रकल्पाचंही भूमिपूजन झालं. कोरोना काळात उपचारांच्या सुविधा निर्माण करतानाच मुंबई सारख्या वेगवान महानगराचा विकासाचा वेग कमी होऊ दिला नाही. मुंबई वाढतेय तसा तिच्या विकासाचा वेगही कायम राखला जातोय असं मुंबईला दिशा आणि वेग देणाऱ्या नव्या पिढीच्या विचारांना प्रत्यक्षात उतरवण्यात आल्यानं मेट्रोचं काम आखीव रेखीव आणि देखणं झालं आहे अशा शब्दात त्यांनी मेट्रो रेल्वेच्या प्रगतीपथावर असलेल्या कामाचं कौतुकही केलं.
आधुनिकतेची कास धरणाऱ्या आणि तरीही प्राचीनतेचा वारसा असलेल्या मुंबई शहरात होत असलेली विकास कामं हे सांघिक यश असल्याचं ते म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुण्यश्लोक अहिल्या देवी यांच्या जयंतीनिमीत्त त्यांना अभिवादनही केलं.पुण्यश्लोक अहिल्या देवी यांच्या आदर्श राज्यकाराभाराप्रमाणेच राज्य शासनाचं काम सुरू असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले. राज्याला देशातलं प्रगतीशील राज्य बनवण्यात मुंबईचा मोठा वाटा आहे. राज्याचा प्रगतीचा वेग कायम राखण्यासाठी देशाच्या ही आर्थिक राजधानी वेगवान ठेवण्याच काम विविध पायाभूत प्रकल्पांच्या माध्यमातून होत असल्याचं त्यांनी सांगितलं. वादळात मोठी झाडं उन्मळून पडल्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी भेट घेतली. त्यातून झालेल्या चर्चेनुसार, राज्यात हेरिटेज ट्री ही संकल्पना राबवणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईच्या विकासासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रयत्न करू, असं आश्वासन या कार्यक्रमाला उपस्थित असलेले केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिलं.
महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह राज्याचे अनेक मंत्री, स्थानिक लोकप्रनिधी, राजकीय नेते आणि संबंधित अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते