नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविडच्या दुसर्‍या लाटेतून देश झपाट्यानं सावरत असून उपचाराधीन रुग्णसंख्येत सातत्यानं घट होत आहे. आज सलग 19 व्या दिवशी नव्या कोरोना बाधितांच्या संख्येपेक्षा बरे झालेल्या कोविड 19 च्या रुग्णांची संख्या जास्त होती. आज सकाळपर्यंतच्या 24 तासात 2 लाख 55 हजाराहून अधिक रुग्ण बरे झाले त्यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर आणखी वाढून 92 पुर्णांक 9 शतांश टक्के झाला. याच काळात देशभरात 1 लाख 27 हजार सातशे 10 नवे कोरोना बाधित आढळले. हा गेल्या 54 दिवसांतला निचांक आहे. चाचण्यांच्या तुलनेत बाधित आढळण्याचा दर 6 दिवसांपुर्वीच 10 टक्क्यांच्या खाली आला होता. आज तो 6 पुर्णांक 62 शतांश टक्क्यांवर आला.

आतापर्यंतच्या कोरोनाबाधितांपैकी केवळ 6 पुर्णांक 73 शतांशटक्के रुग्णांवर सध्या रुग्णालयात किंवा विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत. या उपचाराधीन रुग्णांची संख्या दुसर्‍या लाटेतील उच्चांकी संख्येच्या निम्म्याहून कमी 18 लाख 95 हजार पाचशे 20 इतकी आहे. तब्बल 43 दिवसांनंतर ही संख्या 20 लाखाहून कमी झाली. आतापर्यंत कोविड 19 चे 2 कोटी 59 लाखाहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत पण 3 लाख 31 हजार आठशे 95 रुग्णांना या रोगामुळे प्राण गमवावे लागले. काल 2 हजार सातशे 95 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. दैनंदिन मृत्यूसंख्याही सातत्यानं घटते आहे.

भारतीय वैद्यक संशोधन संस्था कोरोना चाचण्यांच्या क्षमतेत सातत्यानं वाढ घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. आता देशात 2 हजार 600 प्रयोगशाळांतून या चाचण्या होतात. आतापर्यंत 34 कोटी 67 लाखाहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. काल एका दिवसात 19 लाख 25 हजाराहून अधिक चाचण्यांचा नवा उच्चांक नोंदवला गेला. चाचण्यांचं प्रमाण वाढल्यानं रुग्णांना वेळेत उपचार मिळणं शक्य होत असल्यानं साथीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळू लागल्याचं दिसतं आहे.