नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लहान मुलांच्या वापरासाठी ट्विटर हे व्यासपीठ जोपर्यंत सुरक्षित होत नाही, तोपर्यंत त्यांना ट्विटरचा वापर करता येण्यापासून अटकाव करावा, अशी विनंती राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगानं केंद्र सरकारकडं केली आहे.तसंच, ट्विटर कंपनीविरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणीही त्यांनी दिल्ली पोलिसांकडं केली आहे. बालकांवर होणाऱ्या लैंगिक शोषणाबाबतचं साहित्य उपलब्ध असणाऱ्या आणि जिथून त्याची विक्री होते, अशा व्हॉट्सअप ग्रुपच्या  लिंक ट्विटरवर उपलब्ध आहेत, असा दावा बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष प्रियांक कानुनगो यांनी केला आहे. याशिवाय, लहान बालकांवर बलात्कार करण्याची धमकीही ट्विटरवरून दिल्याची उदाहरणे घडली आहेत. अशा गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनांची माहिती ट्विटर कंपनीनं भारतीय अधिकाऱ्यांना देणं आवश्यक असल्याचं आयोगाचं म्हणणं आहे. ट्विटर कंपनीनं पॉक्सो कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप कानुनगो यांनी केला आहे.