मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड उपचारांसाठी खासगी रुग्णालयांमधील दर निश्चितीच्या अधिसूचनेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली आहे. यानुसार आता शहरांचे वर्गीकरण करून दर निश्चित केले आहेत. यात निश्चित दरांशिवाय अधिक दर आकारता येणार नाहीत.
खासगी रुग्णालयात कोविड बाधित रुग्णांवर उपचारासाठी ८० टक्के खाटांसाठी शासनानं निश्चित केलेल्या दरानुसार आणि उर्वरित २० टक्के खाटांसाठी खाजगी रुग्णालयांनी निश्चित केलेल्या दरानुसार आकारणी करण्याबाबतची अधिसूचना काल संपल्यानंतर दरांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.
यापूर्वीच्या अधिसूचनेत उपचारांचे दर हे मोठ्या शहरातील रुग्णालयं आणि अतिदुर्गम भागातील रुग्णालयं यासाठी एकच होते. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील जनतेला कोरोना उपचाराच्या खर्चात मोठा दिलासा मिळणार आहे.
रुग्णाला संबंधित रुग्णालयानं लेखा परीक्षण केलेलं देयक देणं बंधनकारक करण्यात आले असून जास्त दर आकारणाऱ्या रुग्णालयांवर भरारी पथकांमार्फत पुन्हा तपासणी करण्याची आणि त्यावर कारवाई करण्याची तरतूद देखील या अधिसूचनेत कायम ठेवण्यात आली असल्याची माहिती राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुधाकर शिंदे यांनी दिली आहे.