मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल कोरोनाच्या नवबाधीत रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या दुपटीहून जास्त होती. काल राज्यात ३५ हजार ९४९ जण बरे झाल्यानं एकंदर बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ५४ लाख ३१ हजार ३१९ झाली असून रुग्ण बरे होण्याचा दर ९४ पूर्णांक २८ शतांश टक्के झाला आहे.

तर काल सलग दुसऱ्या दिवशी नवीन कोरोनाबाधितांची संख्या १५ हजारांपेक्षा खाली राहिली असून; काल १४ हजार १२३ नवीन रुग्ण आढळले. तर राज्यात चाचण्यांच्या तुलनेत बाधित आढळण्याच्या प्रमाणात होत असलेली घटही कायम आहे.

राज्यात २ लाख ३० हजार ६८१ रुग्ण उपचाराधीन आहेत. सध्या पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे ३० हजार ९२ रुग्ण उपचार घेत आहेत.

राज्यात काल ४७७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून एकंदर मृत्यूंची संख्या ९६ हजार १९८ वर गेली आहे. मृत्यूदर १ पूर्णांक ६७ शतांश टक्के झाला आहे.

नाशिक जिल्ह्यात नव्याने आढळणाऱ्या कोरोना बधितांच्या तुलनेत कोरोना मुक्त होणाऱ्यांचं प्रमाण वाढत असल्याचं दिसत असून काल दिवसभरात ४३० नवे बाधित कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत तर १ हजार ४९९ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. काल ३० रुग्णांचा मृत्यू झाला.

सांगलीत काल १ हजार ७ कोरोना बाधित आढळले. तर १ हजार ४५२ रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. काल २६ कोरोनाबाधितांचा मृत्यु झाला. जिल्ह्यात सध्या ११ हजार ४६२ रुग्ण उपचार घेत आहेत.

परभणी शहरासह जिल्ह्यात काल दिवसभरात ६४ नवे कोरोनाबाधित आढळले असून ४०८ रुग्णांना सुटी देण्यात आली. काल २ कोरोनाबाधितांचा मृत्यु झाला. सध्या जिल्ह्यात २ हजार ७८८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

हिंगोली जिल्ह्यात काल ५६ जणांना बरे झाल्यानं सुटी देण्यात आली तर ३० नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. काल दोन कोरोनाबाधितांचा मृत्यु झाला. सध्या २९० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

सोलापूर शहरात काल २२ तर ग्रामीण भागात ५२७ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. काल शहरात २ तर ग्रामीण भागात २१ रुग्णांचा मृत्यु झाला आहे. काल शहरात ४४ तर ग्रामीण भागात ८८७ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं.

नांदेड जिल्ह्यात काल १७७ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले असून २८१ रुग्ण बरे होऊन घरी परतले. नांदेड जिल्ह्यात काल ५ रुग्णांचा मृत्यु झाला. सध्या जिल्ह्यात १ हजार १८७ रुग्णांवर उपचार सुरु असून त्यापैकी ३४ रूग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.

बुलडाणा जिल्ह्यात काल १२८ नवे रुग्ण आढळले. काल ३२० रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर उपचारादरम्यान ३ कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात १ हजार ६३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब उपजिल्हा रुग्णालयातल्या कोरोना सेंटर मध्ये आठ महिन्याच्या मुलाने आणि सात महिन्याच्या मुलीने कोरोनावर मात केली आहे.