मुंबई (वृत्तसंस्था) : उद्योग क्षेत्रात ज्याप्रमाणे इज ऑफ डुईंग बिझीनेस अंतर्गत प्रकल्पांना वेगानं मंजुरी दिली जाते त्याचप्रमाणे कृषी अंतर्गत येणाऱ्या सर्व प्रस्तावांना बँकांनी तातडीनं एक खिडकी योजनेद्वारे मंजुरी देऊन वाढीव पतपुरवठ्याद्वारे शेती आणि शेतकऱ्याला सक्षम करावं, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दिले.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल राज्यस्तरीय बँकर्स समितीची १५१ वी बैठक संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीत राज्याच्या २०२१-२२ साठीच्या ४ लाख ६० हजार ८८१ कोटी रुपयांच्या राज्याच्या पतआराखड्यास मंजुरी देण्यात आली.

या आराखड्यात कृषी क्षेत्रासाठीचे उद्दिष्ट १ लाख १८ हजार ७२० कोटी रुपये असून यामध्ये पिक कर्जासाठीचे उद्दिष्ट ६० हजार ८६० कोटी रुपयांचे आहे.

लघु, मध्यम आणि सुक्ष्म उद्योगांसाठी बँकांच्या वार्षिक पतआराखड्यात  २ लाख ४९ हजार १३९ कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आलं आहे. इतर प्राधान्यगटातील क्षेत्रांसाठीचे पतपुरवठ्याचे उद्दिष्ट ९३ हजार २२ कोटी रुपयांचं आहे.

नियमित कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना १ लाख रुपयांपर्यंत शून्य टक्के व्याजदराने कर्ज देणारी डॉ.पंजाबराव देशमुख व्याज परतावा योजना राज्यात राबविली जाते याची मर्यादा आता ३ लाख रुपयांपर्यंत  वाढवण्यात येत असून बँकांनी या वाढीव मर्यादेप्रमाणे शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून द्यावं. असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.