मुंबई (वृत्तसंस्था) : खासगी रुग्णालयातल्या म्युकरमायकोसीसच्या उपचाराचे दर राज्य सरकारने निश्चित केले आहेत. शहरांच्या वर्गीकरणानुसार हे दर निश्चित करण्यात आले असून त्यापेक्षा अधिक दर खासगी रुग्णालयांना आकारता येणार नाही.
सर्वसाधारण खाटे साठी अ वर्ग शहरात प्रतिदिन जास्तीत जास्त ४ हजार रुपये, ब वर्ग शहरात ३ हजार रुपये आणि क वर्ग शहरांसाठी २४०० रुपये कमाल आकारणी करता येईल. त्यात देखरेख, नर्सिंग, चाचण्या, औषधी, बेड्सचा खर्च आणि जेवणाचा समावेश आहे.
मात्र मोठ्या चाचण्या, तपासणी तसचं उच्च पातळीवरची मोठी औषधं यातून वगळण्यात आली आहेत. रुग्ण आयसीयूवर असेल तर अ वर्ग शहरांत प्रतिदिन जास्तीत जास्त साडे ७ हजार रुपये, ब वर्ग शहरांसाठी साडे ५ हजार रुपये आणि क वर्ग शहरांसाठी साडे ४ हजार रुपये असतील तर व्हेंटीलेटरसह आयसीयूत असलेल्या अ वर्गातल्या शहरांमधल्या रुग्णांकडून ९ हजार रुपये, ब वर्ग शहरांतल्या रुग्णांकडून ६७०० रुपये आणि क वर्ग शहरांतल्या रुग्णांकडून दररोज ५४०० रुपये घेता येतील.
अ वर्ग शहरांत मुंबई तसेच महानगर क्षेत्र पुणे तसेच पुणे महानगर क्षेत्र, नागपूर यांचा समावेश आहे. ब वर्ग शहरांमध्ये नाशिक, अमरावती, औरंगाबाद, भिवंडी, सोलापूर, कोल्हापूर, वसई-विरार, मालेगाव, नांदेड, सांगली यांच्यासह सर्व जिल्हा मुख्यालये यांचा समावेश आहे.
तर क वर्ग गटात अ आणि ब गटाव्यतिरिक्त इतर शहरे यांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे म्युकरमायकोसीस आजारातल्या २८ प्रकारच्या शस्त्रक्रियांसाठीचा खर्च अ वर्ग शहरांमध्ये त्यासाठी १ लाख रुपयांपासून ते १० हजार रुपये, ब वर्ग शहरांसाठी ७५ हजार रुपयांपासून ते साडे ७ हजार रुपयांपर्यंत आणि क वर्गातील शहरांसाठी ६० हजार रुपयांपासून ते ६ हजार रुपयांपर्यंत दर निश्चित करण्यात आलेले आहेत.
हे दर ३१ जुलै २०२१ पर्यंत राज्यभर लागू राहील. राज्य शासनाच्या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काही दिवसांपूर्वीच जाहीर केला होता.
त्यानुसार महात्मा फुले जनआरोग्य आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत सहभागी रुग्णालयातून म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जात आहेत.