मुंबई : ‘मतदान हा आपल्याला मिळालेला घटनादत्त अधिकार असून या अधिकाराचा वापर आपण विचारपूर्वक व काळजीपूर्वक करायला हवा. मात्र, हा वापर करण्यासाठी आपले नाव मतदार यादीत असणे गरजेचे आहे,’ अशी माहिती देतानाच मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मतदार यादीत नाव नोंदविण्याचे आवाहन केले.

“तुमचे नाव मतदार यादीत आहे का?” असा प्रश्न महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विचारला. त्यावर अनेक विद्यार्थ्यांनी त्यांचे नाव मतदार यादीत असल्याचे सांगितले. तर काही विद्यार्थ्यांनी त्यांचे वय अद्याप १८ पूर्ण झाले नसल्याने नोंदविलेले नाही असे सांगितले. त्यावर जिल्हाधिकारी महोदयांनी १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी आगाऊ नाव नोंदणी करून मतदार यादीत नाव नोंदविता येते. तथापि, मतदानाचा अधिकार मात्र १८ वर्षे वय पूर्ण झाल्यानंतरच प्राप्त होतो अशी माहिती विद्यार्थ्यांना देत जे विद्यार्थी आता १८ वर्षे पूर्ण करणार आहेत त्यांनी लवकरात लवकर आपले नाव  मतदार यादीसाठी नोंदवावी,  असे आवाहनदेखील जिल्हाधिकारी श्रीमती चौधरी यांनी आज केले.

आजपासून भारत निवडणूक आयोगाने एकत्रिकृत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होत असून यानिमित्ताने त्या  अभियानाच्या निमित्ताने  महाविद्यालयीन युवक युवतींना मार्गदर्शन करताना बोलत होत्या. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्री.अजीत साखरे, मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी श्री.जगतसिंह गिरासे, तहसिलदार श्री.विरसिंग वसावे, तहसिलदार श्री.सचिन भालेराव, तहसिलदार श्री.मिलिंद मुंढे आणि मान्यवर उपस्थित होते.

आज विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम २०२३  अंतर्गत आयोजित  वॉकथॉन या जनजागृती रॅलीस  जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. या प्रभात फेरीच्या समारोपप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी महोदयांनी माहिती दिली की, मतदार याद्या सुधारित करण्यासाठीचा ‘विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम २०२३’ यास  सुरुवात होत आहे. पूर्वी मतदार यादी मध्ये नाव नोंदणी करावयाची असल्यास ती सामान्यपणे वर्षातून एकदा किंवा निवडणुकीच्या काही कालावधी आधी करता येत असे. मात्र, आता यात सुधारणा करण्यात आली असून आता वर्षातून चार वेळा मतदार यादी मध्ये नाव नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. छायाचित्रासह प्रारूप मतदार यादी आज म्हणजेच दिनांक ९ नोव्हेंबरला होणार प्रसिद्ध होत असून या यादीत आपले नाव असल्याची खातरजमा सर्व मतदारांनी आवर्जून करून घ्यावी. ही यादी विधानसभा मतदारसंघाच्या मध्यवर्ती कार्यालयात अवलोकानार्थ उपलब्ध असेल, असेही  जिल्हाधिकारी श्रीमती. चौधरी यांनी सांगितले.

यापूर्वी मतदार नोंदणीसाठी  १ जानेवारी किंवा त्या आधी १८ वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना मतदार नोंदणी करता येत होती.  मात्र, आता २०२३ पासून  जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर या महिन्यांच्या १ तारखेला किंवा त्याआधी ज्या नागरिकांची अठरा वर्षे पूर्ण होतील, त्यांना मतदार म्हणून नोंदणी करण्याचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे युवकांना वयाची १८ वर्षे पूर्ण होताच मतदानाचा अधिकार प्रत्यक्ष स्वरूपात प्राप्त होणार आहे, अशीही माहिती जिल्हाधिकारी श्रीमती चौधरी यांनी आजच्या कार्यक्रमादरम्यान दिली.

यासंदर्भात दावे व हरकती दि. ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२२ या कालावधीत स्वीकारण्यात येतील तर दिनांक ५ जानेवारी २०२३ रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी केली जाणार आहे.

मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमानुसार १ जानेवारी, २०२३ या अर्हता दिनांकावर आधारीत पुरवणी आणि एकत्रीकृत प्रारुप मतदार यादी तयार करणे, ९ नोव्हेंबर, २०२२ रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करणे. तसेच ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२२ पर्यंत दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी आहे. त्याचप्रमाणे, दि.१२ व १३ नोव्हेंबर २०२२ रोजी दिव्यांग व महिलांसाठी आणि दि.२६ व २७ नोव्हेंबर, २०२२ रोजी तृतीयपंथी व देह व्यवसाय करणाऱ्या महिला, भटक्या व विमुक्त जमातीच्या व्यक्तींची मतदार म्हणून नाव नोंदणी करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.

या कालावधीत दिनांक १ जानेवारी २०२३  रोजी १८ वर्ष वय पूर्ण होत असलेल्यांची नवीन मतदार म्हणून नोंदणी करण्यात येणार असून ज्या नागरिकांचे दि. १ ऑक्टोबर २०२३ पर्यंत १८ वर्ष वय पूर्ण होणार आहे, ते पण नवीन मतदार नोंदणीसाठी आगाऊ अर्ज करु शकणार आहेत, असे मुंबई उपनगर जिल्ह्याच्या निवडणूक कार्यालयाद्वारे कळविण्यात आले आहे.

यासंदर्भातील दावे व हरकती असल्यास त्या  दिनांक २६ डिसेंबर २०२२ पर्यंत निकालात काढण्यात येणार आहेत.

तरी, आजपासून सुरू झालेल्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये मुंबई उपनगर जिल्ह्यातील नागरिकांनी मतदार म्हणून नाव नोंदणी करावी आणि यासंदर्भात काही दावे व हरकती असल्यास  त्यासुद्धा ज़रुर कळवाव्यात, असेही आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती चौधरी यांनी केले आहे.