मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात मोसमी पावसाची आगेकूच सुरु आहे. ३५ टक्क्याहून जास्त प्रदेश मान्सूनने व्यापला असून मुंबई आणि उत्तर कोकणात तो अपेक्षेआधीच दाखल झाला आहे. काल संध्याकाळपासून आज सकाळी ८ वाजेपर्यंत सांताक्रूझ इथं ५० पूर्णांक ४ दशांश मिलीमीटर, तर कुलाबा इथं ६५ पूर्णाक ४ दशांश मिलीमीटर पावसाची नोंद झाली. शहराच्या सखल भागात पाणी साचलं होतं. रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. पूर्व द्रुतगती मुक्त महामार्गावर मुसळधार पावसामुळं दृष्यमानता कमी झाली होती. ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातही जोरदार पाऊस होत आहे. मुंबई शहर आणि उपनगर परिसरात पुढचे ६ दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे.