मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत मान्सूनच जोरदार आगमन झालं असून सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सखल भागात ठिकाणी पाणी भरल्यामुळे रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.

हिंदमाता, किंग्ज सर्कल, माटुंगा, कुर्ला, यासह सखल भागात पाणी भरलं आहे, रेल्वे रुळावर पाणी भरल्यामुळे मध्य रेल्वे तसंच ट्रान्स हार्बर मार्गावरची रेल्वे वाहतूक ११ च्या सूमारास खंडित झाली आहे. तुंबलेल्या पाण्याचा उपसा करण्यासाठी पालिकेनं २७० ठिकाणी पंप बसविले आहेत.

पुढचे सहा दिवस मुंबईत जोरदार पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तविली असून आपत्ती निवारणासाठी सज्ज असल्याचं महापालिकेनं कळंवलं आहे.

नवी मुंबई क्षेत्रात पहाटेपासून गडगडाटासह जोरदार पाऊस पडत आहे. अतिवृष्टीच्या इशाऱ्यानुसार महापालिकेचा आपत्कालीन व्यवस्थापन विभाग सक्रिय करण्यात आला आहे.

ठाणे शहरात काल रात्री मुसळधार पाऊस पडला. सकाळीही पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे.

पालघर जिल्ह्यात सर्वत्र पावसाचं वातावरण असून अनेक ठिकाणी पावसाची अधूनमधून रिपरिप सुरू आहे.

हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी आणि वसमत तालुक्यात काल रात्री मुसळधार पाऊस पडला. सकाळपासून काही भागात रिमझिम पाऊस सुरू आहे.

नांदेड जिल्ह्यात काल रात्री कमी अधिक प्रमाणात सर्वदूर पाऊस झाला. अर्धापूर, हदगाव, माहूर, मुदखेड, मुखेड, लोहा, बिलोली या तालुक्यात चांगला, तर धर्माबाद, ऊमरी, किनवट, हिमायतनगर या तालुक्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला.

परभणी जिल्ह्यात पहाटेपासून विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचे वारे आणि जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचलं असून काही भागात विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.

वाशिम आणि अमरावती जिल्हात रात्री हलक्या सरी बरसल्या. सकाळपासून ढगाळ वातावरण आहे.

अकोला जिल्ह्यातल्या काही भागात काल रात्री पाऊस पडला.

रायगड जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. अतिवृष्टी काळात धोकादायक ठिकाणी पोहण्यासाठी जाऊ नये, असं आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केलं आहे.