नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि अमेरिकेनं द्विपक्षीय संबंध,सर्वसमावेशक वैश्विक भागीदारी स्तरावर नेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली.

भारत अमेरिकेतील विशेष नात्याचा पाया जनतेचा एकमेकांशी असलेल्या संबंधांवर अवलंबून आहे, असंही प्रधानमंत्री म्हणाले.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज नवी दिल्ली इथं घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते.संरक्षण क्षेत्रातील सहकार्य हे धोरणात्मक भागीदारीमध्ये वृद्धी होत असल्याचं निर्दशक आहे, असंही मोदी म्हणाले.

तस्करी तसंच मादक पदार्थांबाबतचा दहशतवाद रोखण्यासाठी एक नवी यंत्रणा करण्यावरही दोन्ही देशात समंती झाली असून दहशतवादाच्या समर्थन देणा-यांना रोखण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही ते म्हणाले.

भारताला तेल आणि नैसर्गिक वायू देण्यासाठी अमेरिका महत्त्वाचा स्रोत झाला असल्याचंही त्यांनी सांगितलं. इस्लामिक दहशतवादापासून आपल्या नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी भारत आणि अमेरिका वचनबद्ध असल्याचं ट्रम्प यांनी यावेळी सांगितलं.

अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय विकास आर्थिक महामंडळ भारतामध्ये एक स्थायी कार्यालय निर्माण करेल आणि भारतातील विकासासाठी अमेरिका कार्य करेल, असं ट्रम्प यांनी सांगितलं. भारत आणि अमेरिका दरम्यान आज विविध नव्या करारांवर स्वाक्ष-या झाल्या. मानसिक आरोग्य, औषधांबाबतची सुरक्षितता तसंच इंडियन ऑईल बरोबरच्या कराराचा यात समावेश आहे. २४ रोमिओ हेलिकॉप्टरच्या खरेदीलाही यावेळी अंतिम स्वरूप देण्यात आलं.