मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई आणि कोकण भागात आजपासून ते १५ तारखेपर्यंत अतीवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. मुंबईसह, पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या भागात जोरदार पाऊस पडणार असल्याची शक्यता असून आज मुंबईत जोरदार पाऊस सुरु आहे. या भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला असून लोकांनी अती आवश्यकता असल्याशिवाय घरा बाहेर पडू नये असं आवाहन हवामान शास्त्रज्ञ के. एस. होसालीकर यांनी केलं आहे. या भागात १५ तारखेपर्यंत अतीवृष्टीचा ईशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून मुंबई,रत्नागिरी आणि रायगड आज आणि उद्या साठी रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

मुंबई महानगरपालिकेनं आपत्ती व्यवस्थापन विभागाला सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. आपत्कालीन स्थितीत नागरिकांना सहाय्य करण्यासाठी बेस्ट, अग्नीशमन दल आणि विद्युत विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शहरातल्या ३३ वॉर्डांमध्ये तात्पुरत्या निवाऱ्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष करून मिठी नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या नागरिकांच्या आपत्कालीन सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे.