नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अन्न आणि सार्वजनिक पुरवठा विभागाचे सचिव सुधांशु पांडे यांनी इथेनॉल मिश्रित पेट्रोल कार्यक्रमाची  (EBP) माहिती आज प्रसारमाध्यमांना दिली.

भारतीय मानक संस्थेने E12 आणि E15 मिश्रणाच्या तपशीलाबाबत 2 जून, 2021 रोजी अधिसूचित केले आहे. पुण्यात 3 ठिकाणांहून E 100 चे वितरण करणाऱ्या पथदर्शी प्रकल्पांची सुरुवातही पंतप्रधानांनी केली आहे. मागणी आणि पुरवठ्याबाबतच्या अडचणी दूर करण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनांमुळे, देशात येत्या 2025 पर्यंत इथेनॉल उत्पादन  क्षमता दुप्पट होईल, आणि 20 टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोलचे उद्दीष्ट आम्ही गाठू असा विश्वास DFPD च्या सचिवांनी व्यक्त केला.

भारतीय अर्थव्यवस्थेवरही EBP कार्यक्रमाचा सकारात्मक परिणाम होईल असे श्री सुधांशु पांडे म्हणाले. यामुळे इथेनॉलला इंधन म्हणून प्रोत्साहन मिळेल. स्वदेशी, प्रदूषण विरहीत आणि अक्षय स्वरुपाचे हे इंधन पर्यावरण आणि जैवव्यवस्थेसाठीही लाभदायी आहे.  E20 इंधनाच्या वापराने कार्बन मोनॉक्साइडचे उत्सर्जन 30-50% आणि हायड्रोकार्बनचे उत्सर्जन 20% कमी होते. इथेनॉल मिश्रित पेट्रोलचे लक्ष्य साध्य करण्यासाठी साखर कारखाने आणि मद्य कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीची क्षमता वाढवावी याकरता सरकार प्रोत्साहन देत आहे. त्यासाठी सरकारद्वारे बँकांकडून 6 टक्के कमी  व्याजाने कर्ज उपलब्ध केले जात आहे.

इथेनॉलचे उत्पादन आणि OMCs ना होणारा पुरवठा 2013-14 ते 2018-19 याकाळात पाच पटीने वाढला. 2018-19 मधे 189 कोटी लिटरचा ऐतिहासिक उच्चांक गाठला. त्याद्वारे  5% इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य साध्य झाले. चालू इथेनॉल पुरवठा वर्ष 2020-21 मधे 300 कोटी लिटरपेक्षा अधिक इथेनॉल पुरवठा OMCs ना केला जाऊ शकतो. त्याद्वारे मिश्रणाची 8 ते 8.5 % पातळी गाठली जाईल. याबरोबरच 2022 पर्यंत 10 टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोलचे उद्दीष्ट गाठले जाईल. क्षमता उभारणीसाठी या क्षेत्रात येऊ घातलेल्या 41,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीमुळे ग्रामीण भागात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील तसेच कृषी अर्थव्यवस्थेली बळ मिळेल असेही ते म्हणाले.